For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

जूनमध्ये कृषी क्षेत्रात १ कोटी ३० लाख व्यक्ती बेरोजगार

11:19 PM Jul 07, 2022 IST | द वायर मराठी टीम
जूनमध्ये कृषी क्षेत्रात १ कोटी ३० लाख व्यक्ती बेरोजगार

मुंबईः गेल्या जूनमध्ये देशातील बेरोजगारीचा दरात वृद्धी होऊन तो ७.८० टक्के इतका झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वात मोठी बेरोजगारी कृषी क्षेत्रात दिसून आली असून या क्षेत्रातील १ कोटी ३० लाख लोक बेरोजगार झाले आहेत.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या आर्थिक सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

सीएमआयईच्या आकडेवारीनुसार जून महिन्यात बेरोजगारीची कुऱ्हाड कृषी क्षेत्रावर पडली असून ती टक्केवारी ८.०३ टक्के इतकी आहे. मे महिन्यात बेरोजगारीची टक्केवारी ७.३० इतकी होती.

शहरी क्षेत्रात जून महिन्यातील बेरोजगारी ७.३ टक्के इतकी दिसून आली. ती मे महिन्यात ७.१२ टक्के इतकी नोंदली गेली होती.

लॉकडाउन नसलेल्या महिन्यांतील ही सर्वात मोठी बेरोजगारी असून सध्या ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार सुस्तावले आहेत, जुलैमध्ये पेरण्या झाल्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल असे सीएमआयईचे मुख्य संचालक महेश व्यास यांनी सांगितले.

व्यास म्हणाले, की असंघटित क्षेत्रात दिसून आलेली ही बेरोजगारी चिंताजनक असून कृषी क्षेत्रातून मजुरांनी पलायन केले आहे असेही दिसत नाही शिवाय आर्थिक मंदी आली आहे अशीही परिस्थिती नाही. तरीही शेती क्षेत्रात असे चित्र दिसणे अर्थव्यवस्थेला आव्हान आहे. जूनमध्ये पगारी कर्मचाऱ्यांच्या २५ लाख नोकऱ्याही कमी झाल्या आहे, त्यात सरकारने लष्करी भरतीची संख्या कमी केल्याने अर्थव्यवस्थेवर बेकारांचा बोजा वाढत असल्याचे व्यास म्हणाले.

सीएमआयईने दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक बेरोजगारी हरियाणामध्ये ३०.६ टक्के दिसून आली असून त्यानंतर राजस्थान २९.८ टक्के, आसाम १७.२ टक्के, जम्मू-काश्मीर १७.२ टक्के, बिहारमध्ये १४ टक्के इतकी दिसून आली आहे.

(छायाचित्र प्रतिकात्मक रॉयटर्स )

मूळ वृत्त

Tags :