For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

हिंदी साहित्याला पुढे आणण्यासाठी सतत प्रयत्नांची गरज - गीतांजली श्री

आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय लेखिका गीतांजली श्री म्हणाल्या, की मानवामध्ये एकापेक्षा जास्त भाषा जाणून घेण्याची क्षमता आहे. आपल्याकडे अशी शिक्षण व्यवस्था असली पाहिजे, जी लोकांना त्यांची मातृभाषा किंवा इतर भारतीय भाषा आणि इंग्रजी शिकण्यासाठी प्रोत्साहित करेल, यात काहीच अडचण नाही, परंतु राजकारणात अडकल्याने एक प्रकारची न सुटलेली अडचण बनली आहे.
11:42 PM May 29, 2022 IST | द वायर मराठी टीम
हिंदी साहित्याला पुढे आणण्यासाठी सतत प्रयत्नांची गरज   गीतांजली श्री

लंडन/नवी दिल्ली: हिंदी कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकणाऱ्या गीतांजली श्री या पहिल्या भारतीय लेखिकेला हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळण्याआधी खूप चढ उतार पहावे लागले आहेत.

लेखिका गीतांजली श्री यांच्या ‘रेत समाधी’ या कादंबरीचा डेझी रॉकवेल यांनी केलेला इंग्रजी अनुवाद, ‘टॉम्ब ऑफ सॅन्ड’ला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बुकर मिळवणारी ही भारतीय भाषेतील पहिली कादंबरी आहे.

पुरस्कार जाहीर झाल्यापासून दिल्लीत राहणाऱ्या गीतांजली श्री आणि अमेरिकन अनुवादक डेझी रॉकवेल यांना जगभरातून अभिनंदनाचे संदेश येत आहेत आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

या पुरस्कारानंतर हिंदी साहित्यही चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे, पण ही गती कायम ठेवण्यासाठी काही गांभीर्याने प्रयत्न करावे लागतील, असे गीतांजलींचे मत आहे.

पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर लगेचच हिंदी साहित्याची लोकप्रियता वाढण्यात नक्कीच मदत झाली आहे, तसेच उत्सुकता निर्माण झाली आहे, असे गीतांजलीं म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, “तथापि, हिंदीला केंद्रस्थानी आणण्यासाठी अधिक गंभीर, सातत्याने आणि संघटित प्रयत्न करण्याची गरज आहे. यामध्ये प्रकाशकांना विशेषत: या प्रकारच्या साहित्याचा उत्तम अनुवाद उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. मला हे आवर्जून सांगायचे आहे की हे फक्त हिंदीच नाही तर सर्व दक्षिण आशियाई भाषांना लागू होते.”

भारतात हिंदी भाषेवर इंग्रजीचे वर्चस्व कायम असेल का, अशी भीती त्यांना वाटते का, असे विचारले असता गीतांजली श्री म्हणाल्या, की भाषांमध्ये एकमेकांना समृद्ध करण्याची क्षमता असली पाहिजे म्हणून एक निवडण्याचा प्रश्नच उद्भवू नये.

श्री म्हणाल्या, “हिंदी किंवा इंग्रजी यापैकी एक निवडण्याचा प्रश्नच उद्भवू नये असे मला वाटते. द्विभाषिक किंवा त्रिभाषी किंवा बहुभाषिक असण्यात काय अडचण आहे?”

त्या म्हणाल्या, “मला वाटतं की माणसांमध्ये एकापेक्षा जास्त भाषा जाणून घेण्याची क्षमता आहे. आपल्याकडे अशी शिक्षण व्यवस्था असली पाहिजे, जी लोकांना त्यांच्या मातृभाषा किंवा इतर भारतीय भाषा आणि इंग्रजी शिकण्यासाठी प्रोत्साहित करेल, यात काहीच अडचण नाही, परंतु राजकारणात अडकल्याने एक प्रकारची न सुटलेली अडचण बनली आहे.”

६४ वर्षीय लेखिकेचा असा विश्वास आहे की सर्जनशील अभिव्यक्ती तेव्हाच सर्वोत्तम असते, जी मनुष्यासाठी सहज भाषेत केलेली असते.

अनुवादक रॉकवेल त्यांच्या कॉलेजच्या दिवसांपासूनच हिंदीच्या प्रेमात पडल्या होत्या आणि ‘रेत समाधी’कडे ती ‘हिंदी भाषेचे प्रेमपत्र’ म्हणून पाहतात.

रॉकवेल म्हणाल्या, “बुकरच्या निवड समितीने ‘भारत आणि फाळणीची तेजस्वी कादंबरी’ म्हणून प्रशंसा केलेले हे पुस्तक अनेक वाचकांनी दोन्ही भाषांमध्ये एकत्रीतपणे वाचले आहे, जेणेकरून त्यांना त्याचा पूर्ण आनंद घेता आला.”

त्या म्हणाल्या, “मला आनंद आहे की अनेक लोक दोन्ही एकत्र वाचत आहेत. मला असे वाटते की अनुवादाचे खरे महत्त्व हेच आहे, जेव्हा ते मूळ (पुस्तक) वाचण्यास प्रवृत्त करते.”

Tags :