For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

सुप्रीम कोर्टाचे झी न्यूजच्या संपादकांना अटकेपासून संरक्षण

3 days ago | द वायर मराठी टीम
सुप्रीम कोर्टाचे झी न्यूजच्या संपादकांना अटकेपासून संरक्षण

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वायनाड मतदारसंघातील एक व्हिडिओ प्रेक्षकांची दिशाभूल होईल या पद्धतीने प्रसारित केल्याबद्दल झी न्यूजचे संपादक रजनीश आहुजा यांना अटक करू नये, असे निर्देश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.

या संदर्भात राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. या दोन राज्य सरकारांव्यतिरिक्त केंद्राला नोटीस जारी करताना, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि जेबी पारदीवाला यांच्या खंडपीठाने निर्देश दिले की, त्याच्यावर (आहुजा) आधीच नोंदवलेल्या एफआयआर संदर्भात किंवा भविष्यात कोणतीही जबरदस्ती कारवाई केली जाणार नाही.

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील एका कार्यालयावर डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यावर राहुल गांधी यांनी दिलेली प्रतिक्रिया झी न्यूजचे निवेदक रोहित रंजन यांनी आपल्या शोमध्ये उदयपूरमधील कन्हय्यालाल यांच्या हत्येवर टिप्पणी केली अशी दाखवली. त्यामुळे देशभर गदारोळ उडाला. जी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी वेगळ्या घटनेसंदर्भात व्यक्त केली होती ती प्रतिक्रिया धार्मिक तेढ वाढवणाऱ्या वृत्तांसंदर्भात प्रसारित करण्यात आल्याने संतापही उसळला होता. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व सोशल मीडियातील काही चाणाक्ष नेटकऱ्यांनी झी न्यूजची ही चूक पकडली व रोहित रंजन यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली. त्यानंतर राजस्थान व छत्तीसगड पोलिसांकडे रोहित रंजन यांच्याविरोधात फिर्यादी दाखल झाल्या व त्यांना अटक करावी अशी मागणी सुरू झाली.

या दरम्यान रोहित रंजन यांनी नजरचुकीने आपल्याकडून चुकी झाली याची कबुली देत माफी मागितली. या प्रकरणात झी न्यूजचे संपादक रजनीश आहुजा यांच्यावरही फिर्याद दाखल करण्यात आली. त्यावर आपल्याला अटक करू नये यासाठी आहुजा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर शुक्रवारी न्या. चंद्रचूड व न्या. पारदीवाला यांच्या पीठाने आहुजा यांच्याविरोधात फिर्याद दाखल झाली असून भविष्यात फिर्यादी दाखल झाल्यास त्यांच्याविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये असे निर्देश दिले व त्यांना अटक करू नये असेही सांगितले.

झी न्यूजच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, राहुल गांधी यांच्यासंदर्भातील वृत्ताबद्दल वृत्तवाहिनी पूर्वी माफी मागितली आहे व संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईही केली आहे. झी न्यूजला मिळालेला व्हीडिओ अन्य एका वृत्तसंस्थेकडून मिळाला होता व त्यावर वृत्त एका प्रशिक्षित पत्रकाराने केले होते. त्यामुळे तथ्यात्मक चूक आढळल्यानंतर लगेचच तो हटवण्यात आला व त्याबाबत रंजन यांनी माफीही मागितली होती, असे न्यायालयाला सांगितले.

Tags :