For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

काँग्रेसमध्ये वंचित घटकांसाठी ५० टक्के पदे राखीव ठेवण्याची सूचना

9 days ago | द वायर मराठी टीम
काँग्रेसमध्ये वंचित घटकांसाठी ५० टक्के पदे राखीव ठेवण्याची सूचना

उदयपूरः सध्या येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय चिंतन शिबिरात काँग्रेस पक्षाने पक्षातील ५० टक्के विविध पदे अनु. जाती-जमाती, मागास वर्ग व अल्पसंख्यांकासाठी आरक्षित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. काँग्रेस पक्ष २०२४ च्या सार्वत्रिक निव़डणुकांच्यादृष्टीने प्रयत्नशील झाला असून वंचित गटांना पक्षात अधिक प्रतिनिधित्व देण्याचा पक्षाचा निर्णय राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

शनिवारी चिंतन शिबिराचा दुसरा दिवस होता. या शिबिरात काँग्रेस पक्षाची ढासळलेली संरचना पुनर्वत करण्याच्या दृष्टीने कार्यकर्ते, नेत्यांकडून विचारविनिमय सुरू आहे. गेल्या अनेक निवडणुकांत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. पक्षातील नेत्यांकडून होणारी बंडखोरी, ढासळलेली पक्षरचना, नेतृत्वातील उणिवा व जनतेशी तुटलेली नाळ यामुळे काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आत्मविश्वास गमावून बसला आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना विधायक कार्यक्रम देणे, पक्षसंरचना दुरुस्त करणे व पक्षात उत्साह वाढवण्याच्या दृष्टीने दोन दिवसांत अनेक नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत मांडले. तळागाळातील वर्ग व वंचित वर्गाशी पुन्हा जोडून घेण्यासाठी काँग्रेसचे एक नेते राजू यांनी काँग्रेस अध्यक्षांना मदत करणारी सामाजिक न्याय सल्लागार परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. या परिषदेच्या माध्यमातून पक्ष दर सहा महिन्याला विशेष सत्र बोलावून वंचित, दुबळ्या घटकांसंदर्भात पक्षाने काय पावले उचलली यावर माहितीचे आदानप्रदान करेल. राजू यांनी राष्ट्रीय धोरणानुसार जातीनिहाय जनगणना करणार असून खासगी क्षेत्रात अनु.जाती-जमाती व ओबीसींना आरक्षण दिले जावे असे मत मांडले. महिला आरक्षणात अनु.जाती-जमातींतील महिलांना प्रतिनिधित्व द्यायला हवे असेही ते म्हणाले.

Tags :