For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

हिंदू देवांवर विधान केल्याप्रकरणी दलित प्राध्यापकाला जबर मारहाण

11:42 PM Sep 26, 2022 IST | द वायर मराठी टीम
हिंदू देवांवर विधान केल्याप्रकरणी दलित प्राध्यापकाला जबर मारहाण

नवी दिल्लीः गेल्या महिन्यात फेसबुकवर हिंदू देवदेवता व धार्मिक पूजांवर विधाने केल्या प्रकरणी कोलकाता येथील आचार्य जगदीश चंद्र बोस कॉलेजमधील दलित प्राध्यापक व बुद्धिवादी सुधाकर सरदार (५३) यांना कट्टर हिंदुत्ववादी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी रविवारी जबर मारहाण केली. ही घटना मंदिरबाजार येथे एका कार्यक्रमादरम्यान घडली.

रविवारी संध्याकाळी ८ च्या सुमारास सुधाकर सरदार एका सांस्कृतिक कार्यक्रमाला आले असता ८ जणांच्या एका टोळक्याने सरदार यांना एका मंदिराच्या ठिकाणी नेले व त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात सरदार डोक्याला, छातीला व पोटाला जबर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. सरदार यांना मारहाण होत असताना उपस्थितांपैकी एकानेही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून हे टोळके संघपरिवाराशी संबंधित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. द टेलिग्राफने हे वृत्त दिले आहे.

गेल्या महिन्यात सरदार यांनी फेसबुकवर जन्माअष्टमीच्या निमित्ताने कृष्ण व गोपींच्या संदर्भात काही विधाने टाकली होती. तसेच अंत्यसंस्काराच्या दरम्यान लोकांकडून संपत्तीचे प्रदर्शन केले जात असल्याबद्दलही त्यांनी टीका केली होती. या पोस्टनंतर त्यांना संघ परिवारातल्या काही स्वयंसेवकांकडून धमक्या आल्या होत्या, असे सरदार यांचे म्हणणे आहे. सरदार यांनी या पोस्टबद्दल कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर माफी मागून आपल्या पोस्ट फेसबुकवरून मागेही घेतल्या होत्या. तरीही त्यांना धमक्या मिळत होत्या.

सरदार कोलकाता येथील मनुशेर पाशे या दलित बुद्धिवादी संघटनेचे एक सदस्यही आहेत.

दरम्यान या मारहाणीसंदर्भात आमच्या पक्षाचा काही संबंध नाही असे भाजपचे मथुरापूर युनिटचे अध्यक्ष प्रद्युत बैद्य यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे पण मत व्यक्त करताना दुसऱ्याच्या भावना दुखावू नये याची काळजी घेतली पाहिजे, असे बैद्य यांचे म्हणणे आहे.

मूळ वृत्त

Tags :