For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

निवृत्त गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन

01:13 PM Apr 25, 2022 IST | द वायर मराठी टीम
निवृत्त गृहसचिव डॉ  माधव गोडबोले यांचे निधन

केंद्रीय निवृत्त गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे हृदयक्रिया बंद पडल्याने पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांचे वय ८५ होते. त्यांच्या मागे पत्नी सुजाता, मुलगी मीरा, मुलगा राहुल आणि नातवंडे असा परिवार आहे.

डॉ. गोडबोले यांचा जन्म १५ ऑगस्ट १९३६ रोजी झाला. त्यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र या विषयात एम.ए. आणि पीएच्‌.डी.चे शिक्षण केले. १९५९ साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यांनी महाराष्ट्र शासनात मुख्य वित्तसचिव म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव व नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिले होते. मार्च १९९३ मध्ये केंद्रीय गृहसचिव आणि न्यायसचिव असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

प्रशासकीय सेवेतील निवृत्तीनंतरही ते सक्रीय होते. वृत्तपत्रांतील स्तंभलेखनाच्या माध्यमातून त्यांनी प्रशासकीय अनुभव मांडले. तसेच त्यांनी प्रचलित प्रश्नांवर आपले परखड मत कायम व्यक्त केले.

निस्पृह बाण्याचे अधिकारी असा त्यांचा लौकिक होता.

रामजन्मभूमी प्रकरणाच्या काळात माधव गोडबोले केंद्रीय गृहसचिव होते. देशाची अखंडता आणि एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी बाबरी मशिद संरक्षित करणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. यासंदर्भात त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना पत्र लिहून आग्रह धरला होता. मात्र, बाबरी मशिदी वाचू शकली नाही. त्यामुळे व्यथित होऊन गोडबोले यांनी गृहसचिव पदाचा राजीनामा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माधव गोडबोले यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, “माधव गोडबोले हे महाराष्ट्राचे अत्यंत कतृत्वान अधिकारी होते. यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना, परराष्ट्रमंत्री असताना त्यांचे सचिव म्हणून यांनी काम केले. यशवंतराव चव्हाणांच्या देशभरातील दौऱ्यात ते नेहमीच त्यांच्यासोबत असायचे. महाराष्ट्राच्या मंत्रालयात त्यांनी अनेक वर्षे काम केले. माझ्यासोबतही काम केले. एक स्वच्छ, अत्यंत स्पष्ट. वेळप्रसंगी आम्हा लोकांच्या मतावर देखील आपली भूमिका परखडपणाने मांडायला न कचरणारे, असे एक अधिकारी म्हणून त्यांचा परिचय होता. देशाच्या गृह खात्याची जबाबदारी त्यांनी सचिव म्हणून सांभाळली होती. अत्यंत कठीण परिस्थीतून देखील मार्ग काढण्यासाठी त्यांनी अतिकष्ट घेतले होते. आज एका चांगल्या अधिकाऱ्याला महाराष्ट्रच नव्हे तर देश मूकला आहे.”

Tags :