For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

गोव्यात भाजपकडून ‘काँग्रेस तोडो’ची खेळी

11:12 PM Sep 14, 2022 IST | द वायर मराठी टीम
गोव्यात भाजपकडून ‘काँग्रेस तोडो’ची खेळी

नवी दिल्लीः गोवा काँग्रेसमधील ११ पैकी ८ आमदार बुधवारी सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये सामील झाले. प्रमुख विरोधी पक्ष नेते मायकेल लोबो यांनी स्वतःसह ७ आमदारांचा काँग्रेस विधीमंडळ गट भाजपमध्ये विलीन होत असल्याचा ठराव मांडला. या ठरावाला माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी पाठिंबा दिला.

मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे यांनी काँग्रेसचे ८ आमदार भाजपमध्ये सामील होणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर ही घडामोड झाली आहे.

भाजपमध्ये सामील झालेल्या काँग्रेस आमदारांची नावे दिगंबर कामत, मायकेल, लोबो, देलिया लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प आमोणकर, अलेक्सिओ सिक्वेरा व रुडाल्फ फर्नांडिस अशी आहेत.

गेल्या जुलैमध्ये काँग्रेसने पक्षातील बंडखोरी थोपवली होती. त्या आधी २०१९मध्ये काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

४० आमदारांच्या गोवा विधानसभेत काँग्रेसचे ११ आमदार असून आता ८ जण भाजपमध्ये सामील झाल्याने काँग्रेसचे केवळ ३ आमदार शिल्लक असून भाजपची आमदार संख्या ३३ झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपला २० जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर या पक्षात महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे दोन आमदार सामील झाले. भाजपच्या गोव्या मधील सरकारला अन्य ३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे.

दरम्यान काँग्रेसमधील बंडाळीवर भाष्य करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू असली तरी प्रत्यक्षात काँग्रेसचे आमदार काँग्रेस छोडो करत असल्याचा टोला मारला. पंतप्रधान मोदींना अपेक्षित असलेला न्यू इंडिया व गोव्याचा विकास लक्षात घेऊन काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये सामील झाल्याचा दावा सावंत यांनी केला.

मूळ वृत्त

Tags :