For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

आझाद, शर्मा यांचे राजीनामे, काँग्रेसमधील बंडाळीचे परिणाम

11:34 PM Aug 26, 2022 IST | गौरव विवेक भटनागर
आझाद  शर्मा यांचे राजीनामे  काँग्रेसमधील बंडाळीचे परिणाम

नवी दिल्लीः गेली अनेक दशके एखाद्या नेत्याला प्रस्थापित नेत्याच्याविरोधात उभे राहू द्यायचे नाही हे काँग्रेसचे राजकारण आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास दिल्लीत शीला दीक्षित यांच्यासमोर अजय माकन वा राम बाबू शर्मा यांचे आव्हान पक्षाने उभे राहू दिले नाही. तसेच हिमाचलमध्ये वीरभद्र सिंग यांच्याविरोधात विद्या स्टोक्स यांचे, राजस्थानात अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांचे आव्हान काँग्रेसने बड्या प्रयासाने शमवले. अपवादात्मक परिस्थिती बड्या नेत्यांच्या इच्छा आकांक्षांना काँग्रेसला बळही द्यावे लागले. हरियाणात माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांनी जवळपास काँग्रेसविरोधात बंडाचा इशारा देताच माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांना शांत राहण्यास सांगितले. पक्षाने तन्वर यांच्यावर पक्ष सोडून जाण्याची वेळ आणली. तसेच प्रकरण पंजाबमध्येही दिसून आले. मुख्यमंत्री असताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री व नंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून नवज्योत सिंह सिद्धू यांनी मोठे आव्हान उभे केले होते. या दोन नेत्यांची शाब्दिक वाद जाहीरही झाले होते. या वादातून काँग्रेसने वाट काढताना सिद्धू यांच्या ऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला मुख्यमंत्री पद दिले आणि परिणामी पंजाबातील आपली सत्ता गमावली.

उत्तराखंडमध्येही माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांच्याविरोधात देवेंद्र यादव यांनी रणनीती आखल्या होत्या. रावत यांनी जाहीरपणे नव्हे पण यादव यांना नेस्तनाबूत केले व राज्यातील पक्षावर आपला अंकुश आजही कायम ठेवलेला दिसतो.

गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा

काँग्रेसचा हा गेल्या काही वर्षांतला प्रवाह पाहता शुक्रवारी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला ठोकलेला रामराम हा काही धक्कादायक नव्हता. आझाद हे पक्षनेतृत्वावर कित्येक महिन्यापासून नाराजच होते. जम्मू व काश्मीरचे मुख्यमंत्री पद भूषवलेले व ४ दशकाहून काँग्रेसमध्ये व सत्तेत विविध पदांवर काम केलेल्या आझादांनी या नाराजीतून १६ ऑगस्टला जम्मू व काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा दिला व नंतर त्यांनी राज्य काँग्रेसच्या राजकीय समन्वयक समितीचाही राजीनामा दिला. शुक्रवारी त्यांनी संपूर्ण काँग्रेसचा राजीनामा देत माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकेचे आसूड ओढले.

आझाद यांची काँग्रेसवर नाराजी असण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे काँग्रेसच्या राजकीय घडामोडी समितीचे सदस्य असतानाही त्यांना त्या पदावरून राज्य काँग्रेस समितीचे अध्यक्षपद दिल्याने आपली पदानवती झाली व आपल्याला बाजूला टाकले अशी भावना आझादांची झाली. त्याच बरोबर आझाद यांचे अत्यंत निकटवर्तीय गुलाम अहमद मीर यांची जम्मू व काश्मीर काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी करून तेथे विकार रसूल वाणी यांची नियुक्ती केल्याने आझादांना धक्का बसला होता.

जम्मू व काश्मीरमध्ये जरी अद्याप निवडणुकांच्या घोषणा झालेल्या नसल्या तरी येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मतदार याद्या जाहीर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आल्याने निवडणुका फारशा लांब नाहीत, याची राजकीय समज निश्चितच आझाद यांना आली असणार.

आझाद यांनी पक्ष सोडण्याचे अन्य एक कारण असेही आहे की, ज्या असंतुष्ट जी-२३ गटाने पक्षनेतृत्वाविरोधात आवाज उठवला होता, त्याचे नेतृत्व आझादच करत होते. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवून काँग्रेसच्या नेतृत्वात बदल व पक्षातील रचना बदलण्याची मागणी या जी-२३ नेत्यांनी केली होती. या पत्रानंतर या असंतुष्ट नेत्यांविरोधात पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती.

आनंद शर्मांची नाराजी

आझाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असली तरी आनंद शर्मा यांनी अद्याप पक्ष सोडलेला नाही. शर्मा हे जी-२३ गटातील एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनाही काँग्रेस पक्षाने हिमाचल काँग्रेसच्या कामकाजातून बाहेर पडण्यास सांगितले. या राज्यात पुढच्या वर्षी निवडणुका आहेत.

शर्मा हे हिमाचल काँग्रेस सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत. पण निवडणुकां प्रचारातून बाजूला काढल्याने त्यांच्यापुढे काँग्रेस सुकाणू समितीचा पदभार सोडण्याशिवाय अन्य मार्ग नव्हता. त्यांनी सोनिया गांधी यांना राजीनामा पाठवताना स्वाभिमानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे निक्षून सांगितले. शर्मा यांनी ट्विटरवर आपला राजीनामा जड अंतःकरणाने दिला जात असल्याचे म्हटले. आपली उभी हयात काँग्रेससाठी खर्च झाली व पुढेही ती राहील पण स्वाभिमान राखण्यासाठी आपल्यापुढे राजीनाम्याशिवाय पर्याय नव्हता असे त्यांचे ट्विट आहे. शर्मा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मात्र दिलेला नाही.

शर्मा हे भाजपमध्ये जातील अशा वावड्या उठल्या, त्यावर लगेचच स्पष्टीकरण देत त्यांनी आपण अखेरपर्यंत काँग्रेसच्या मुल्यांशी एकनिष्ठ राहू अशी मीडियाला प्रतिक्रिया दिली व वादावर पडदा टाकला. काँग्रेस गटातटात अडकलेला पक्ष आहे, आज काँग्रेसच भाजपला आव्हान देऊ शकतो असेही शर्मा म्हणून गेले.

एकंदरीत अंतर्गत बंडाळी, असंतोषच काँग्रेसपुढे आज खरे आव्हान आहे. पंजाब व दिल्ली ही राज्ये याच मुळे काँग्रेसला गमवावी लागली. उत्तराखंड, हरयाणा येथे ते अंतर्गत वादामुळे भाजपला रोखू शकले नाहीत आणि आता हिमाचल प्रदेश व जम्मू आणि काश्मीर या राज्यातील बंडाळी काँग्रेसला धोकादायक ठरू शकते.

ज्येष्ठ नेत्यांनी पक्षातील दोष सांगण्याचे प्रयत्न केले आहेत ते दूर करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाला पुढे आले पाहिजे व त्यावर मार्ग काढला पाहिजे.

मूळ बातमी  

Tags :