For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

राज्याकडून व्हॅटमध्ये कपात; पेट्रोल-डिझेलचे दर उतरले

a month ago | द वायर मराठी टीम

मुंबई: केंद्र शासनाने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य सरकारने रविवारी दुपारी उशीरा पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलवरचे महिन्याचे ८० कोटी रुपये आणि डिझेलवरचे १२५ कोटी रुपये इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३ आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.

या दरवाढीनंतर विरोधी पक्ष व जनतेतून मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त होत होता. परिणामी शनिवारी अचानक केंद्र सरकारने पेट्रोलच्या प्रती लीटर अबकारी करात ८ रुपये व डिझेलच्या प्रती लीटर अबकारी करात ६ रुपयांची कपात केली. या निर्णयामुळे पेट्रोलची प्रती लीटर दर ९ रु.५० पैशाने तर डिझेल प्रती लीटर ७ रुपयांनी स्वस्त झाले. सरकारने घरगुती सिलेंडरचेही दर कमी केले असून १२ सिलेंडरपर्यंत प्रत्येक सिलेंड़रमागे २०० रुपयाची सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता. इंधन दराच्या या कपातीमुळे सरकारच्या महसूलात वार्षिक १ लाख कोटी रुपये इतकी घट अपेक्षित आहे. तर घरगुती सिलेंडरवरच्या सवलतीमुळे वार्षिक ६१०० कोटी रु. महसूलात कपात होणार आहे.

Tags :