For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

ममता दिदींना विशेष पुरस्कार दिल्याने साहित्यिकांची पुरस्कार वापसी

12 days ago | द वायर मराठी टीम
ममता दिदींना विशेष पुरस्कार दिल्याने साहित्यिकांची पुरस्कार वापसी

कोलकाताः प. बंगाल बांग्ला अकादमीने राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या साहित्य सेवेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार जाहीर केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद बंगालच्या साहित्यिकांमध्ये दिसून येत आहेत. बुधवारी प्रसिद्ध बंगाली लेखिका रत्ना रशीद बॅनर्जी यांनी बांग्ला अकादमीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आपला पुरस्कार परत देत असल्याची घोषणा केली. मंगळवारी साहित्य अकादमीच्या बंगाली सल्लागार समितीचे एक सदस्य व लेखक-संपादक अनंदीरंजन बिश्वास यांनी आपला पदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर बुधवारी दुसरे राजीनामा नाट्य घडले.

बुधवारी जगप्रसिद्ध साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी हा पुरस्कार देण्यात येणार होता. तसा कार्यक्रमही झाला. या कार्यक्रमाला ममता बॅनर्जी उपस्थित होत्या पण त्यांच्या वतीने राज्याचे शिक्षणमंत्री ब्रात्य बसू यांनी पुरस्कार स्वीकारला.

काही दिवसांपूर्वी बांग्ला अकादमीने साहित्यातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. अकादमीने बंगाली कवितांमध्ये योगदान दिल्याबद्दल ममता बॅनर्जींच्या नावावर शिक्कामोर्तब केले. ममतांचे ‘कविता बितन’ हे सुमारे ९०० कवितांचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले असून ज्या व्यक्ती बंगाली साहित्यात सतत योगदान देत असतात व समाजहितासाठी धडपड करत असतात अशा साहित्यिकांना पुरस्कार दिले जातील असे बंगाली अकादमीचे म्हणणे आहे.

राज्य सरकारच्या साहित्य पुरस्कार वापसी करणाऱ्या रत्ना रशीद बॅनर्जी यांची ३० हून अधिक पुस्तके व लघु कथा प्रसिद्ध झाल्या असून त्यांनी लोककलेमध्येही उल्लेखनीय असे संशोधन केले आहे. त्यांना २००९मध्ये बंगला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ममता बॅनर्जी यांना विशेष पुरस्कार दिल्याने मला एक लेखक म्हणून अपमान वाटत असून त्याने एक घातक पायंडा पडला आहे, अशी प्रतिक्रिया रत्ना रशीद बॅनर्जी यांनी दिली आहे. ममता बॅनर्जी यांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दल, संघर्षाबद्दल आपल्याला त्यांचे कौतुक आहे, मी स्वतः त्यांना मतदान केले होते पण ममता दिदींचे साहित्यातील योगदान काय आहे, हा मला पडलेला प्रश्न असल्याची प्रतिक्रिया रत्ना रशीद बॅनर्जी यांनी दिली आहे.

मूळ बातमी

Tags :