For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

नेतन्याहूंच्या निकटवर्तींयांवर पिगॅससची हेरगिरी

12:13 AM Feb 09, 2022 IST | द वायर मराठी टीम
नेतन्याहूंच्या निकटवर्तींयांवर पिगॅससची हेरगिरी

जेरुसलेमः इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मुलगा व त्यांचे काही निकटवर्तीय यांच्यावर इस्रायलच्या पोलिसांकडून पिगॅसस स्पायवेअरमार्फत पाळत ठेवण्यात आली होती, असा गौप्यस्फोट इस्रायलमधील ‘कॅलकलिस्ट’ (Calcalist) या वर्तमानपत्राने केला आहे.

इस्रायलच्या पोलिसांनी आपल्याच देशातील काही वरिष्ठ सरकारी अधिकारी, कॅबिनेट मंत्रालयांतील माजी संचालक, महापौर, बडे उद्योजक, पत्रकार, आंदोलक, नागरिकांवरही पिगॅसस स्पायवेअरमार्फत पाळत ठेवली होती, असे ‘कॅलकलिस्ट’ने दावा केला आहे. ‘कॅलकलिस्ट’ने पिगॅसस प्रकरणासंदर्भात वृत्तमालिका प्रसिद्ध केली असून नेतन्याहूंच्या भ्रष्टाचारासंदर्भात पुरावे मिळवण्यासाठी पिगॅससचा वापर करण्यात येत होता, असाही दावा केला आहे. नेतन्याहूंचा मुलगा एवनर, दोन सल्लागार व एका महिलेवर पिगॅससमार्फत पाळत ठेवण्यात आली होती, असे ‘कॅलकलिस्ट’चे म्हणणे आहे.

नेतन्याहू यांच्यावर भ्रष्टाचार, लाच स्वीकारणे, विश्वासघात केल्या प्रकरणाची काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नेतन्याहू इस्रायलच्या पंतप्रधानपदी १२ वर्ष होते. पण गेल्या जूनमध्ये त्यांना पदावरून खाली खेचण्यात विरोधकांना यश आले व तेथे सध्या डाव्या-उजव्या-मध्यम विचारसरणीचे राजकारण करणाऱ्या काही पक्षांनी सरकार स्थापन केले आहे.

गेल्या काही दिवसांत पिगॅसस हेरगिरी प्रकरणाची माहिती जगभरातील वर्तमानपत्रांमधून उघडकीस येत आहे. त्या पैकी भारतासंदर्भातील एक वृत्त जानेवारी महिन्यात द न्यू यॉर्क टाइम्समधून प्रसिद्ध झाले होते. द न्यू यॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात पिगॅसस स्पायवेअरची खरेदी भारत-इस्रायल संरक्षण कराराचा एक भाग होता, असा गौप्यस्फोट केला होता.

न्यू यॉर्क टाइम्स काय म्हणाले?

पिगॅसस स्पायवेअर इस्रायलमधील कंपनी एनएसओने तयार केले होते व ते भारत-इस्रायल दरम्यान सुमारे २ अब्ज डॉलर करारातील संरक्षण सज्जता व शस्त्रास्त्र खरेदीचा एक भाग होते असे द न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तात पिगॅसस स्पायवेअरच्या निमित्ताने इस्रायलचे अनेक देशांशी असलेले राजनयिक संबंध कसे तणावाचे झाले होते. अमेरिकेच्या एफबीआयने पेगॅसस स्पायवेअर कसे मिळवले याचाही खुलासा केला आहे. एनएसओने पिगॅसस स्पायवेअर पोलंड, भारत व हंगेरी या देशांना पुरवले होते, या तीन देशात समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींवर सरकारकडून पाळत ठेवली जात होती, असेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. इस्रायलकडून जागतिक राजकारणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होता व नफ्याच्या उद्देशाने एनएसओने पिगॅसस सारखे अत्यंत शक्तीशाली स्पायवेअर तयार करण्याचा फायदा कट्टर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांनी घेतला. इस्रायल सरकारने एनएसओच्या दमनकारी बाजूंकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हे स्पायवेअर मानवाधिकाराची गळचेपी होत असलेल्या पोलंड, भारत, हंगेरी देशांना सहज विकले गेले असे या वृत्तात म्हटले आहे.

हिंदू राष्ट्रवादाच्या जोरावर पुन्हा सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी जुलै २०१७मध्ये इस्रायल दौरा केला. इस्रायलचा दौरा करणारे मोदी हे  भारताचे पहिले पंतप्रधान होते. मोदींचा इस्रायल दौरा अत्यंत काटेकोर व सुनियोजितपणे आखण्यात आला होता. इस्रायलचे तत्कालिन पंतप्रधान नेत्यान्याहू मोदींसोबत एका समुद्र किनारी अनवाणीही चालत गेले होते. असे प्रकार दोन्ही देशांमध्ये संबंध अधिक दृढ झाल्याचे द्योतक सांगणारे होते. या दौऱ्यात भारत-इस्रायल दरम्यान संरक्षण, लष्करी सामग्री खरेदीचे सुमारे २ अब्ज डॉलरचे करारही झाले होते. या करारात पिगॅसस स्पायवेअर व क्षेपणास्त्र खरेदीही होती, असे न्यू यॉर्क टाइम्सचे म्हणणे आहे. पण या खरेदीची विस्तृत माहिती न्यू यॉर्क टाइम्सने उघडकीस आणलेली नाही. मात्र भारत-इस्रायल मैत्रीचे उदाहरण म्हणून मोदींच्या इस्रायल दौऱ्यानंतर नेत्यान्याहू यांनी महिन्याभरात भारताचा दौरा केला होता. या घटनेकडे न्यू यॉर्क टाइम्सने लक्ष वेधले आहे.

पिगॅसस काय प्रकरण आहे?

एनएसओने पिगॅसिस या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जगातील १० देशांतील महत्त्वाचे राजकीय नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर, न्यायाधीश, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवली होती. हे सॉफ्टवेअर एनएसओने अनेक देशांच्या सरकारला विकले होते. त्यामुळे सरकारला हेरगिरी करणे, माहिती मिळवणे सोपे गेले होते. या हेरगिरी प्रकरणात पिगॅसिसने अॅपल मोबाइलमध्ये शिरकाव करून माहितीची चोरी केली होती. या माहितीच्या चोरीचा व हेरगिरीचा खुलासा द वायर सहित १७ आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी उघडकीस आणला होता. पिगॅसस हेरगिरी प्रकरणाचे अनेक फोरेन्सिक पुरावे हाती लागले होते. युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या सिटीझन लॅब व एम्नेस्टी इंटरनॅशनलच्या सिक्युरिटी लॅबने या पुराव्यांची पुष्टीही केली होती.  त्यामुळे जगभर खळबळ माजली होती.

पिगॅसिस हेरगिरीमध्ये जगभरातील ५० हजार ग्राहकांचे मोबाइल क्रमांक आढळून आले होते. या मोबाइल क्रमांकवर हेरगिरी, पाळत ठेवली जात होती वा हेरगिरी व पाळत ठेवण्यासाठी हे क्रमांक निश्चित करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली होती. भारतात ३००हून अधिक जणांचे मोबाइल क्रमांक निश्चित करण्यात आले होते.