For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

राहुलवर निशाणा साधत गुलाम नबी आझाद काँग्रेसमधून बाहेर

11:26 PM Aug 26, 2022 IST | द वायर मराठी टीम
राहुलवर निशाणा साधत गुलाम नबी आझाद काँग्रेसमधून बाहेर

नवी दिल्ली/श्रीनगरः काँग्रेसचे ज्येष्ठ व अनुभवी नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांच्यावर पक्ष बुडवण्याचा आरोप करत काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्यामागची कारणे त्यांनी पाच पानाच्या पत्रात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना सांगताना अत्यंत कठोर मनाने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी वा त्यांचे सुरक्षा रक्षक वा पीए हेच पक्षाचे निर्णय घेतात, असा सनसनाटी आरोपही त्यांनी केला आहे.

आपल्या पत्रात आझाद म्हणतात, काँग्रेसने भारत जोडो यात्रा घेण्यापेक्षा काँग्रेस जोडो यात्रा घ्यावी. पक्षात खालच्या स्तरावर एकदाही निवडणूक झालेली नाही. काँग्रेसने लढण्याची इच्छाशक्ती व क्षमता गमावली आहे. पक्षातील सर्व ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांना दूर सारले गेले आहे. २०१३मध्ये जेव्हा राहुल गांधींना काँग्रेसचे उपाध्यक्ष केले तेव्हापासून पक्षात चमचेगिरी व भाटगिरीला ऊत आला आहे. राहुल गांधी यांनी यूपीएने, मंत्रिमंडळाने, पंतप्रधानांनी, राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेला अध्यादेश सर्वांसमक्ष फाडला व तेथून काँग्रेसच्या अवनतीला सुरूवात झाली. यूपीए सरकारची संस्थात्मक रचना रिमोट कंट्रोल मॉडेलमुळे उध्वस्त झाली हे मॉडेल आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये लागू झाला आहे. एकच नेता आहे. पक्षाचे महत्त्वाचे निर्णय एकतर राहुल गांधी घेतात वा त्यांचे सुरक्षा रक्षक वा पीए घेतात. अशा जुन्या पक्षाचे पतन होताना मला यातना होतात, अशी खंत आझाद यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

नवा पक्ष काढण्याची शक्यता

जम्मू व काश्मीरमध्ये आगामी निवडणुका पाहून गुलाम नबी आझाद नवा पक्ष काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेले दोनेक वर्षे गुलाम नबी आझाद यांची भाजपची जवळीक वाढत होती. त्यांना भाजपने सामाजिक उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रतिष्ठेचा पद्मविभूषण पुरस्कार दिला होता. पण दुसरीकडे काँग्रेसने आझाद यांना पुन्हा राज्यसभा सदस्यत्व न दिल्याने ते नाराज होते. राज्यसभेतील अखेरच्या दिवशी आझाद यांच्या संसदीय कार्याचा गौरव करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. त्यानंतर आझाद यांनी मोदींचे कौतुक केले होते. या सर्व घडामोडीमुळे काँग्रेसचे नेतृत्व आझाद यांच्यावर नाराज होते. आझाद यांनी असंतुष्ट जी-२३ गटाचे नेतृत्वही केले होते. तोही त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचाच प्रयत्न होता.

Tags :