For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

विश्वउत्पत्तीचे पहिले छायाचित्र नासाकडून प्रसिद्ध

11:38 PM Jul 12, 2022 IST | द वायर मराठी टीम
विश्वउत्पत्तीचे पहिले छायाचित्र नासाकडून प्रसिद्ध

वॉशिंग्टनः आपल्या विश्वाच्या उत्पत्तीचा वेध घेणाऱ्या सर्वात शक्तिशाली समजणाऱ्या नासाच्या जेम्स वेब दुर्बिणीने विश्वउत्पत्तीचे पहिले छायाचित्र सोमवारी पृथ्वीवर पाठवले. हजारो नव्हे तर अगणित आकाशगंगांचे आजपर्यंतचे सर्वात स्पष्ट असे छायाचित्र जेम्स वेब दुर्बिणेने टिपले असून सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी व्हाइट हाउसमध्ये नासाचे संचालक बिल नेल्सन यांच्या उपस्थितीत हे छायाचित्र जगापुढे जाहीर केले. जेम्स वेब दुर्बिणीने घेतलेले हे पहिलेच छायाचित्र असून सुमारे १३.८ अब्ज वर्षांपूर्वी एक स्फोट होऊन विश्वाची निर्मिती झाली होती, त्यानंतरच्या काही वर्षानंतरचे हे छायाचित्र आहे. या छायाचित्रानंतर मंगळवारी नासाने अनेक छायाचित्रे प्रसिद्ध केली.

जेम्स वेबने घेतलेले हे छायाचित्र विज्ञान व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक क्षणाचे प्रतिनिधित्व करणारे असून खगोल विज्ञान, अंतराळ संशोधनासाठी तसेच अमेरिका व पूर्ण मानवजातीसाठी हे ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया बायडन यांनी व्यक्त केली. नासाने विश्वाच्या निर्मितीनंतरच्या काही काळातले हे छायाचित्र प्रसिद्ध केल्यानंतर जगभरातील सर्व प्रसार माध्यमे, सोशल मीडियामध्ये या छायाचित्राची चर्चा सुरू झाली. जेम्स वेब दुर्बिणीने आपल्या ब्रह्मांडाकडे पाहण्याचा मानवाचा दृष्टीकोन बदलला, ही पहिलीच झलक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

नासाने प्रसिद्ध केलेले छायाचित्र आजपर्यंतच्या ब्रह्मांडाच्या छायाचित्रांपैकी सर्वात खोलवर जाऊन घेतलेले SMACS 0723 या अनेक आकाशगंगाच्या जाळ्यांचे रंगीत छायाचित्र आहे. ही आकाशगंगा पृथ्वीपासून ५.१२ अब्ज प्रकाश वर्षे एवढी दूर आहे.

Tags :