For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील महाविद्यालयात प्रवेश नाही

11:06 PM Sep 16, 2022 IST | द वायर मराठी टीम
युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील महाविद्यालयात प्रवेश नाही

नवी दिल्लीः युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर तेथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शेकडो भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम अपुरा ठेवत मायदेशी परतावे लागले. पण या विद्यार्थ्यांना भारतातल्या वैद्यकीय महाविद्यालयात सामावून घेता येणार नाही असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

युक्रेनमधून मायदेशात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची त्यात वैद्यकीय शाखेत चौथ्या वर्षांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आपले अपुरे राहिलेले शिक्षण घेण्यासाठी भारतातल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश द्यावा अशी मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिकाही दाखल केल्या आहेत. या विविध याचिकांवर आपले प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने दाखल केले असून या प्रतिज्ञापत्रात सरकारने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून (नॅशनल मेडिकल कौन्सिल-एनएमसी) देशातील कोणत्याही वैद्यकीय संशोधन संस्था वा विद्यापीठात परदेशी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार या संदर्भात विद्यार्थ्यांना काहीच मदत करू शकत नाही, असे न्यायालयात स्पष्ट केले.

यावर न्या. हेमंत गुप्ता व न्या. सुधांशू धूलिया यांच्या पीठाने युक्रेनहून आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी सरकारने एक वेब पोर्टल उभे करावे, या पोर्टलमध्ये अपुरा अभ्यासक्रम झालेल्या विद्यार्थ्यांची सूची तयार करावी व त्यांचा अपुरा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी केंद्राने शैक्षणिक गतिशीलता कार्यक्रमाच्या माध्यमातून परदेशातील पर्यायी वैद्यकीय महाविद्यालयांची यादी द्यावी, असे सूचवले. हे वेबपोर्टल पारदर्शी असावे. यात वैद्यकीय जागा व शुल्क यांचे माहिती स्पष्ट असावी, असेही न्यायालयाने निर्देश दिले.

न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी आता २३ सप्टेंबरपर्यंत स्थगित केली आहे.

युक्रेनमधून मायदेशी आलेल्या विद्यार्थ्यांना प. बंगाल सरकारने एनएमसीची परवानगी न घेता आपल्या राज्यातल्या सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील ४१२ जागा खुल्या करून दिल्या होत्या, त्याने वाद वाढला होता.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या १८ हजार भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत यावे लागले. त्यातील चौथ्या वर्षांत शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचण निर्माण झाली आहे.

गेल्या पाच वर्षांत युक्रेनमध्ये दरवर्षी ३ ते ४ हजार विद्यार्थी वैद्यकीय विद्यालयांमध्ये प्रवेश घेतात.

मूळ बातमी

Tags :