For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

आनंद शर्मा यांचा हिमाचल काँग्रेस सुकाणू समितीचा राजीनामा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की त्यांचा कोणत्याही पक्षाच्या बैठकीला सल्लामसलत किंवा निमंत्रण न दिल्याने त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला आहे.
08:53 PM Aug 22, 2022 IST | द वायर मराठी टीम
आनंद शर्मा यांचा हिमाचल काँग्रेस सुकाणू समितीचा राजीनामा

नवी दिल्ली: हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी रविवारी पक्षाच्या राज्य सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांचे हे पाऊल काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

शर्मा यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की पक्षाच्या कोणत्याही बैठकीला सल्लामसलत किंवा निमंत्रित न केल्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा यांनी पत्रात म्हटल्याचे समजते, की त्यांच्या स्वाभिमानाशी तडजोड केली जाऊ शकत नाही आणि त्यांनी सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

शर्मा यांच्यापूर्वी, ‘जी २३’ गटाचे आणखी एक नेते गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

‘जी-२३’ नावाच्या पक्षाच्या असंतुष्ट गटाने काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पूर्णवेळ अध्यक्ष आणि संघटनेत वरपासून खालपर्यंत बदल करण्याची मागणी केली आहे.

शर्मा यांनी ट्विट केले, की “मी जड अंत:करणाने हिमाचल निवडणुकीसाठी काँग्रेस सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मी आजीवन काँग्रेसचा आहे आणि मी माझ्या विश्वासावर उभा आहे.

ते म्हणाले, ‘माझ्या रक्तात काँग्रेसची विचारधारा आहे आणि मी त्याकहीशी कटिबद्ध आहे, यात शंका नाही! तथापि, एक स्वाभिमानी व्यक्ती म्हणून, मला सतत बहिष्कार आणि अपमानामुळे कोणताही पर्याय उरला नाही.

सल्लामसलत प्रक्रियेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे शर्मा यांनी काँग्रेस अध्यक्षांना सांगितले आहे. मात्र, राज्यातील पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

काँग्रेस नेते मंगळवारपासून जनसंपर्क कार्यक्रमाला सुरुवात करणार असून कसौली आणि इतर ठिकाणी त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.

शर्मा, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते, यांची २६ एप्रिल रोजी हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Tags :