For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

एका मृत्यूचा थरारक पाठलाग : 'हू किल्ड जज लोया'

11:02 PM Sep 19, 2022 IST | प्रियांका तुपे
एका मृत्यूचा थरारक पाठलाग    हू किल्ड जज लोया

सोहराबुद्दिन बनावट चकमक खटल्याचं कामकाज पाहणारे सीबीआयचे विशेष न्यायाधीश दिं. ब्रिजगोपाल लोया यांच्या २०१४ मध्ये गूढ, चमत्कारिक परिस्थितीत झालेल्या मृत्यूमागचं कृष्णविवर शोधून काढण्याचं जोखमीचं काम पत्रकार निरंजन टकले यांनी केलं आहे. २०१७ मध्ये सनसनाटी मथळ्यांखाली याबद्दलचे सविस्तर वृत्तांत ‘द कॅरावान’ या मासिकात छापून आले. या वृत्तांतातून वाचकांना कळलेल्या बाबी हिमनगाच्या टोकाएवढ्या होत्या, त्याखाली आणखी काय दडलेलं आहे, ते सारं पुस्तकरुपानं प्रसिद्ध केल्याबद्दल आणि मुळात जीवावरची जोखीम पत्करुन लोया प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून, हाती गवसलं ते लोकांना सांगण्याचा टकले यांचा प्रयत्न आहे. जीवावरची जोखीम पत्करून टकलेंनी हा शोध घेतला, याच केवळ कारणासाठी नव्हे तर त्यातून निर्माण होणाऱ्या मोठ्या प्रश्नांना सामोरं जाण्याची आपली नागरिक म्हणून तयारी आहे का, हे तपासण्यासाठीही हे परिचयपर टिपण.

२०१४ मध्ये न्या. लोया यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला, असं तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना वाटलं होतं तरी ही बाब तेव्हा उजेडात आली नव्हती. २०१६ मध्ये लोया यांची भाची निरंजन टकलेंना भेटली, तिनं त्यांना सांगितलेले तपशील चक्रावून टाकणारे होते, त्यानंतर टकलेंनी याचे धागेदोरे खणून काढायला सुरूवात केली.

मृत्यूनंतर दोन वर्षांनी त्याबद्दल काही शोध घेणं किती आव्हानात्मक होतं, हे सारं लेखकानं तपशीलवार पुस्तकात लिहिलं आहे. २०१६-१७ या वर्षभराच्या काळात, प्रत्येक पायरीवर जोखीम घेत हाती लागलेली माहिती, पुरावे, त्याची छाननी, त्याकडे पाहण्याचा वस्तुनिष्ठ दृष्टीकोन, त्यातली व्यावसायिकता, कायदेशीर बाबींची पूर्तता, अदृश्य ठिपके, कड्या यांची जोडणी हे सारं केल्यावर, ज्या द वीक या प्रथितयश मासिकाकरता ते हे काम करत होते, त्यांनी याबद्दलचं वार्तांकन छापायला नकार दिला. त्यावर टकलेंनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि आणखी काही माध्यमांना हे वार्तांकन छापण्याबाबत विचारणा केली. अखेरीस ‘द कॅरावान’ या मासिकाने अनेक बाजूंनी हे वार्तांकन पडताळून मग ते छापलं. ही गोष्ट साधारण सगळ्यांनाच माहीत असेल. मात्र पुस्तक वाचल्यावर एक नवीन गोष्ट कळते ती ही, की जी माध्यमं एरव्ही आपल्या निर्भीड वार्तांकन आणि सुस्पष्ट भूमिकांसाठी ओळखली जातात, अशा माध्यमांनीही सुरुवातीला हा शोधवृत्तांत छापायला नकार दिला होता.

न्या. लोया यांच्या मृत्यूमागचं सत्य शोधण्याची प्रक्रिया नेमकी कधी आणि कशी सुरू झाली, हा काळ किती आव्हानात्मक होता, त्यात लेखकाचा अनेक अंगांनी झालेला संघर्ष हे सारं लेखकानं तपशीलवार लिहिलं आहे आणि ते झपाटून टाकणारं आहे. ते पुस्तकातच विस्ताराने वाचायला हवं. मात्र त्यांनी समोर आणलेले मुद्दे थरकाप उडवणारे आहेत.

‘न्या. लोया (सीबीय विशेष न्यायाधीश) यांचा मृत्यू होतो आणि त्याचं पार्थिव केवळ रुग्णवाहिका चालकासोबत त्यांच्या मूळ गावी गटेगावला पाठवलं जातं. एकही न्यायाधीश, वकील, सरकारी अधिकारी त्या रुग्णवाहिकेसोबत जात नाही. लोया यांचं सरकारी घर – पत्नी, मुलं मुंबईत असताना त्याचं पार्थिव गटेगावला कोण आणि का पाठवतं? त्यांच्या शवविच्छेदन अहवालाचं पहिलं पान सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या साठ पानी कागदी जंत्रीत का पुरवलं जात नाही. शव विच्छेदन अहवालावर तारखांची खाडाखोड का केलेली आहे? हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला, तर मृत्यूपूर्व त्यांची न्युरोसर्जरी का करण्यात आली, बरं ती करण्याची वैद्यकीय गरज भासली तर त्याचा उल्लेख शवविच्छेदन अहवालात का केला नाही? शवविच्छेदन अहवाल आणि विसेरा रिपोर्ट, इतर वैद्यकीय अहवाल यात मृत्यूच्या कारणाबाबत एकवाक्यता का नाही? ईश्वर बाहेती कोण आहे? लोया यांच्या मालकीच्या वस्तू – पैशाचं पाकिट, मोबाईल इ. रीतसर पंचनामा करून कुटुंबियांच्या हाती पोलिसांनी सोपवण्याऐवजी, त्यांचा मोबाईल ईश्वर बाहेती नावाची व्यक्ती लोया कुटुंबियांकडे का सोपवते? त्या मोबाईलमधला सगळा डेटा, कॉल लॉग्ज, मेसेजेस इ. का गायब केलेले होते? ते कोणी गायब केले?

न्या. लोया यांच्यासोबत नागपूरला गेलेले त्यांचे सहकारी न्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश मोहित शहा – लोया कुटुंबियांला सांत्वनासाठी, मृत्यूनंतर २ महिन्यांनी भेटतात, ते का? ज्या रवीभवन गेस्ट हाऊसमध्ये मृत्यूआधीच्या दिवसापर्यंत न्या. लोया राहत होते, त्या गेस्टहाऊसच्या आवाराचं एकही सीसीटीव्ही फुटेज आजवर का पुरवलं गेलं नाही?’ हे आणि असे आणखी काही मूलभूत प्रश्न टकले त्यांच्या शोधनकार्यात उपस्थित करतात. हे केवळ हवेत उपस्थित केलेले प्रश्न नसून लोया कुटुंबियांनी टकले यांना ऑन रेकॉर्ड पुरवलेल्या माहितीच्या आणि स्वत:च्या तपासकामात जे सापडत गेलं, लोया यांच्या मृत्यूबाबत जे कथन सांगितलं जात होतं, त्यातल्या विसंगतींच्या आधारे उपस्थित केलेले तर्कसंगत प्रश्न आहेत. कसं ते सविस्तर समजून घेण्यासाठी मात्र पुस्तक वाचणं महत्वाचं आहे.

न्या लोयांच्या मृत्यूबद्दल निर्माण झालेले प्रश्न हा या पुस्तकाचा गाभा आहे, त्यासोबतच या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी वेळोवेळी न्यायालयात दाखल केलेल्या याचिका, त्यादरम्यान झालेला कोर्ट ड्रामा, सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं, सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी घेतलेली ऐतिहासिक पत्रकार परिषद, त्या परिषदेत – केसेसचं रॉस्टर बनवण्यातला तत्कालीन सरन्यायाधीशांच्या (दीपक मिश्रा) पक्षपातीपणाचा मांडलेला मुद्दा – त्याचा न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकांशी असलेला संबंध – तशी त्या चार न्यायाधीशांनीच माध्यमांसमोर दिलेली कबुली या सर्व बाबींची संगती लावली तर भारतीय न्यायवस्थेची सद्य स्थिती काय आहे, ते दिसून येतं, त्याकरता वेगळ्या विश्लेषणाची गरज नाही. न्यायालयीन लढाया किती गुंतागुंतीच्या असतात, त्यातल्या कायदेशीर बाबी, पळवाटा विशेषत: हाय प्रोफाईल क्रिमिनल केसेसशी संबंधित लोकांचे एकमेकांत गुंतलेले किचकट हितसंबंध आपण फिक्शनमध्ये वाचतो, सिनेमात पाहतो, पण प्रत्यक्षात घडलेल्या एखाद्या अशा घटनेचा सविस्तर वृत्तांत वाचला तर एरव्ही लक्षात न येणारे अनेक कंगोरेही त्यातून दिसतात.

या पुस्तकात तुम्हाला प्रश्नांची दोन अधिक दोन चार अशी सरधोपट उत्तरं मिळत नाहीत, प्रश्न मात्र खूप पडू शकतील. तर्कसंगत विचार केला तर संशयाची सुई कुठे, कुणाकडे वळते हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. मुखपृष्ठावरही ते पुरेसं सूचक पद्धतीनं आलं आहे. प्रश्न एकट्या न्या. ब्रिजगोपाल लोया यांच्या संशयास्पद रितीने झालेल्या मृत्यूचा नाही. आपल्याकडे पोलीस कोठडीतल्या संशयास्पद मृत्यूंपासून, एन्काऊंटर्स आणि इतरही प्रकारच्या संशयास्पद मृत्यूंची निष्पक्ष चौकशी होते का? मृतांच्या वारसांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आणि न्याय मिळतो का? हे प्रश्न महत्वाचे आहेत. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने हैदराबादमध्ये बलात्काराच्या आरोपींचं २०१९ मध्ये झालेलं ‘एन्काऊंटर’ कसं एन्काऊंटर नव्हतं, असा निर्वाळा (चौकशी समितीच्या अहवालाच्या) हवाल्याने दिला आहे. आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे, त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

कोठडी मृत्यू, बनावट चकमकी (एनकाऊंटर्स) आणि एखाद्या तत्वनिष्ठ सामर्थ्यवान व्यक्तीची हत्या यात फरक असला तरी त्यानंतर सार्वजनिक अवकाशात त्याबद्दल फार बोललं जाणार नाही, संघटितपणे या घटनांना-गुन्ह्यांना प्रतिरोध केला जाणार नाही, याची पुरेपूर काळजी यंत्रणेकडून घेतली जाते. ती घेतली जात असताना साम-दाम-दंड-भेद अशा सगळ्या नीती वापरल्या जातात. कॅरावानमधला वृत्तांत, त्यानंतर भारतीय माध्यमांनी याबद्दल लावून धरलेल्या बातम्या यामुळे तापलेल्या वातावरणात न्या. लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली. त्याचदरम्यान न्या. लोया यांचा मुलगा अनुज लोयाने पत्रकार परिषद घेतली. ती पत्रकार परिषद कुठे भरवली गेली, कुणी आयोजित केली होती, त्यातली अनुजची – ‘आमच्या मनात लोयांच्या मृत्यूबाबत कोणताही संशय नाही.’ हे सांगतानाची देहबोली आणि त्यानंतर क्रमाक्रमाने माध्यमांतून, सार्वजनिक अवकाशातून ही चर्चा बाजूला पडत गेली. एका महत्वाच्या खटल्याचं काम पाहणाऱ्या सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांच्या संशयास्पद मृत्यूची फाईल अशी (संविधानिक मार्ग त्यातल्या पळवाटा इ. च्या आधारावरच) बंद होऊ शकते, त्यानंतर त्यांचे कुटूंबीय जवळपास अज्ञातवासात जातात, तिथं सामान्य नागरिकाची काय कथा!

आज लोया कुटुंबीय कुठे आहे, काय करतं, सुरक्षित आहे की नाही, याची काहीच माहिती कुणाला असण्याची शक्यता नाही. न्या. लोया यांची मुलं समाजमाध्यमांपासूनही दूर आहेत. एका पीडित कुटूंबाला समाजापासून असं तोडून रहावं लागतं, हे दुर्दैवी आणि दहशतीचंही आहे. सामान्य नागरिक म्हणून आपण या साऱ्याकडे कसं पाहतो? हा मोठा प्रश्न आहे. तो एका कहाणीपुरता, पुस्तकापुरता मर्यादित नाही. टकलेंसारख्या मूठभर व्यक्ती जोखीम पत्करून सत्य शोधनाचं धाडस दाखवतील, पण त्यामुळे सार्वजनिक विवेक जागृत होईल का? प्रश्न विचारण्याचं धाडस दाखवेल का? हे प्रश्न महत्वाचे आहेत.

केवळ पुस्तकाचा परिचय करून देणं हा या टिपणाचा उद्देश नव्हता, म्हणून पुस्तक कसं आहे? या प्रश्नाचं उत्तर इथं शेवटच्या परिच्छेदात – शोध-वृत्तांत (इन्व्हेस्टिगेटिव स्टोरी) रिपोर्ताज स्वरुपातून सांगितल्यानं पुस्तक अतिशय वाचनीय झालं आहे, जबरदस्त क्राईम थ्रिलर वाचल्याचा अनुभव देणारं, पानापानावर उत्कंठा वाढवणारं असं हे पुस्तक आहे, फक्त ते फिक्शन नसून सत्य घटित आहे, याची आपल्या मेंदूला अधूनमधून आठवण करून द्यावी लागते, इतक्या भयचकित वाटणाऱ्या घटना वाचायला मिळतात.

एक बारीक मर्यादाही नोंदवणं गरजेचं आहे. न्या. लोया यांची कहाणी सांगत असताना टकले त्यांच्या इतर इन्व्हेस्टिगेटिव स्टोरीजबद्दलही काही ठिकाणी सांगतात, ते थोडंसं दाताखाली खडा आल्यासारखं होतं. न्या. लोया यांच्या कहाणीत वाचक इतका गुंगून गेलेला असतो की त्याचबाबतीत आता पुढे काय होतंय, याची उत्सुकता असताना त्यांच्या इतर स्टोरीजचे तपशील तिथं अस्थानी वाटतात. ज्या स्टोरीजचा उल्लेख करण्यामागे काही सबळ कारणं, संदर्भ आहे का, याबद्दल तिथं तसे उल्लेख महत्वाचे आहेत पण काही ठिकाणी लेखकानं हा मोह थोडा टाळला असता तर फारच उत्तम झालं असतं. मात्र या एका मर्यादेव्यतिरिक्त हे पुस्तक फार महत्वाचं आहे आणि शोध पत्रकारिता करणाऱ्यांना, इतर माध्यमकर्मींना, नागरी चळवळीला ऊर्जा, प्रेरणा, दिशा देणारंही आहे.

Tags :